con...1
जालना जिल्ह़यातून राहूल गांधी यांच्या येत्या पाच मार्च च्या औरंगाबाद येथील सभेस एक हजार बसेस आणण्याचे नियोजन जालना जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, संपर्कमंत्री राजेंद्र दर्डा, आ. अब्दुल सत्तार, आ. कैलास गोरंटयाल व जिल्हाध्यक्ष भिमराव डोंगरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात या संदर्भातील निर्धार व्यक्त करण्यात आला.
महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विमलताई आगलावे, घनसावंगी तालुकाध्यक्ष विष्णुपंत कंटुले, अंबड तालुकाध्यक्ष भवानीदास कुलकर्णी, मंठा ता. अध्यक्ष संदिप गोरे, भोकरदन ता. अध्यक्ष् सुरेश पाटील, जाफ्राबाद ता. अध्यक्ष सुरेश् गवळी, जालना ता. अध्यक्ष वसंत डोंगरे, बदर चाउस, राजेश राठोड, सेवा दलाचे प्रमुख प्रशांत वाढेकर, माजी आ. धोंडीराम राठोड, आर. आर. खडके, शहराध्यक्ष अब्दुल हफीज, जालना लोकसभा मतदारसंघ निवडणुक निरीक्षक तुकाराम रेंगे, विनायकराव देशमुख, कॉंग्रेसचे प्रभारी संजय राठोड, महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब देशमुख, परतूरचे अन्वरबापु देशमुख, एनएसयुआयचे प्रविण सातोनकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. व्यासपीठावर आ. अब्दुल सत्तार, विनायकराव औताडे, माजी आ. शकुंतला शर्मा, शैलजा काळे, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर भांदरगे उपस्थित होते.
राहूल गांधी यांच्या सभेला जालना जिल्ह़यातून येणा-या सर्वांची भोजनाची व्यवस्था आपण करणार आहोत अशी घोषणा आ. कैलास गोरंटयाल यांनी केली. तर वातावरण खुप चांगले आहे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेउ नका, राहूल गांधी यांची सभा यशस्वी झाली तर आपल्या विजयाचा मार्ग प्रशस्त होईल, मात्र सभेला येणा-यांचे रिअलिस्टीक आकडे द्या, असे जालना जिल्ह़याचे कॉंग्रेसचे संपर्कमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले. सभेला येणा-या प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांची यादी, गाड़यांचे फोटो व तपासणी आपण स्वतः स्वतंत्र यंत्रणेतून करणार आहोत तेव्हा थापा मारणा-या कार्यकर्त्यांची नोंद डायरीत घेणार असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले. नियोजनाच्या जबाबदारीत राजेंद्र दर्डा, आ. कैलास गोरंट़याल व भिमराव डोंगरे यांना जबाबदार धरण्यात येईल, असे त्यांनी शेवटी सांगितले.
------------------------------ ------------------------------ ---------------------------
चौकट -
राहूल गांधी यांच्या सभेच्या तयारीचे नियोजन करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या मेळाव्यात कटाक्षाने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात कुणीच काहीही बोलायचे नाही, असा सक्तीचा फतवा काढण्यात आला होता, तरी देखील प्रारंभीच महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा विमलताई आगलावे यांनी जालना जिल्ह़यावर न्याय करा असे बोलून विषयाला सुरूवात करून दिली. अंबडचे भवानीदास कुलकर्णी यांनी विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ऐनवेळेवर आपला पत्ता कटल्याचा संदर्भ वापरत संपर्कमंत्री राजेंद्र दर्डा आणि माणिकराव ठाकरे यांना जालना जिल्ह़याला यावेळेस तरी न्याय द्या असेच म्हटले. या दोन्ही वक्त्यांची रि ओढत माजी आ. धोंडीराम राठोड, माजी आ. शकुंतलादेवी शर्मा, आर.आर. खडके, राजेश राठोड यांच्यासह सर्वांनीच जालना जिल्ह़याला न्याय द्या या एकाच वाक्यात लोकसभेची उमेदवारी निश्चीत करतांना जालन्याच्या स्थानिक उमेदवाराचा विचार करा असे म्हटले. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी त्यांच्या दोन मिनीटांच्या भाषणात लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात एकही वाक्य उच्चारले नाही तसेच उमेदवारी या विषयाला स्पर्शही केला नाही. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भिमराव डोंगरे बोलत असतांना त्यांना थांबवून चार वाक्यातच बोला व्यासपीठावरील कुणांची नावेही घेउ नका असे बजावले. दुपारी 1 वा. नियोजीत वेळेनुसार येणारे ठाकरे साडेचार वाजता आले व अर्ध्या तासात मेळावा संपवून लगेच परत गेले.
------------------------------ ------------------------------ -----------------------
जालना लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेसचा उमेदवार पक्ष नेतृत्व ठरवणार आहे असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले. जालन्यात पत्रकारांशी ते बोलत होते. उमेदवार जालना जिल्ह़याचा असेल की, औरंगाबाद जिल्ह़यातून असेल या प्रश्नावर त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. उमेदवाराची निवड पक्ष् नेतृत्व करणार एवढेच त्यांनी सांगितले. कॉंग्रेस पक्षात बंडखोरी होणार नाही, जालन्याची जागा शंभर टक्के कॉंग्रेसच लढवणार राष्ट्रवादीचा येथे प्रश्न नाही, बदला बदली अन्यत्र एखाद्या जागेवर होउ शकेल असे ते म्हणाले.
------------------------------ ------------------------------ -------------------
दुपारी 1 वाजेपासून मेळाव्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी उत्सुक जिल्हाध्यक्ष भिमराव डोंगरे म्हणाले मेळावा आणि लोकसभा निवडणुक हे दोन्ही विषय एकत्र करूत मात्र तब्बल साडेचार तास उशीरा सुरू झालेल्या कार्यक्रमात उमेदवारीचा विषयच कुणी काढायचा नाही असे बजावल्याने डोंगरे यांच्या गटाची नाराजी झाली. आई आली आहे तर थोड फार रडून काही मिळवू असे डोंगरे त्यांच्या प्रास्ताविकात म्हणालेच पण ठाकरे यांनी त्यांना तीथेच थांबवले. उमेदवारीच्या चर्चेत असलेले आ. कल्याण काळे मेळाव्याला उपस्थित नव्हते ते उमेदवारीलाही उत्सुक नाहीत अशी चर्चा होती.

